पृष्ठे

पृष्ठे

शनिवार, २४ जून, २०१७

शाळा भेट


 शाळा भेट 

( शाळा  प्रवेश  ) 

 आपण प्रत्येक शाळेने प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात, वाजतगाजत विद्यार्थ्यांच्या स्वागतासह  साजरा केला. त्यासाठी शाळांची सजावट केली. तोरण बांधले , रांगोळी काढली. आपल्या शाळा ग्रामीण भागातील असल्यामुळे  नुकताच पाऊस झाल्यामुळे आपल्या शाळांचे वातावरण निसर्गमय, प्रसन्न, मातीचा दरवळणारा सुगंध,  नुकतीच  झाडांना फुटलेली पालवी त्यामुळे हिरवाईने नटलेला परिसर . पावसामुळे काळ्या आईने नेसलेला हिरवा शालू. कधी ऊन तर कधी सावली , शाळेच्या परिसरात सुरु असलेली शेतीची कामे, कधी काळे ढग तर कधी निळे  आकाश अशा उत्साहपूर्ण वातावरणात  शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. हा प्रवेश उत्सव म्हणजेच शाळा भेट आणि ही भेट म्हणजे स्मरणात राहावी अशी आनंदाची डोही आनंद तरंग एक संस्मरणीय आठवणच  .....वारीला निघतांना सर्व तयारी  करून वारीला जाण्याची जी ओढ वारकरी बंधूची असते. तशीच काही  आपली  स्थिती झालेली . वर्षभर चालणाऱ्या आपल्या शैक्षणिक वारीचे टाकलेले हे पहिले पाऊलच...  कारण  काही मुल आजच्या  दिवसापासून  घराला काही वेळासाठी पारखी होणार असल्याने  आपल्या पालकांना लगडलेली तर काही आपण शाळेत जाणार म्हणजे  नेमके काय करणार .  आपल्या आईला सोडून राहावे लागणार म्हणून रडणारे बालगोपाळ , सर / मॅडम आज पासून हा माझा मुलगा  तुमच्या हवाली हा हुशार झाला पाहिजे. कारण मला काही कामातून वेळ  मिळत नाही असे सांगणारे पालक  तर माझ बाळ माझ्यापासून दिवस भरासाठी दूर राहणार. माझ्या मुलाची काळजी शाळेत घेतली जाईल ना  ह्या चिंतेत असलेली मम्मी... आणि बरी झाली शाळा सुरु झाली. आज पासून आपली थोड्या वेळासाठी तरी सुट्टी होणार असा सुटकेचा निश्वास घेणार्‍या आजीबाई...आपले शिक्षक व शाळा लई भारी आहे.असा  गौरव करून आम्हा शिक्षकांना प्रेरणा देणारे आजी आजोबा .  हे  सर्व दिव्य घेऊन शाळा भेटी पासून सुरु झालेला हा प्रवास मग  आमच्या शिक्षक बंधू बघीनिसाठी एक कसोटीच असते.  बालगोपालाळांच्या प्रश्नांना सामोरे जातांना सुरुवातीच्या  दोन तीन  दिवसातील  अनेक मजेदार गोष्टी घडतात.  ह्या बालगोपाळांचे प्रश्न,चर्चा  - सर शाळा कधी सुटणार ?  माझी मम्मी कधी येणार ? पाणावले डोळे करून तर कधी अश्रूंना वाटमोकळी करून देत मला घ्यायला पप्पा खरचं येणार आहे का ? मला जेवण करायचे नाही. मला आज लवकर घरी बोलावले आहे. मला जेवण करायचे आहे.  माझ्या पपाला फोन करा. माझा दादा घरी आला असेल त्याला खेळायला जोडी कोणी नसेल मी घरी जाऊ का, आज वावर कोळपायचे आहे. आज आमच्या शेळ्या चारायला कोण नेईल ?  आमचं घर कोण सांभाळील ?  मला गावात जायचे आहे. मी खेळायला जाऊ का ?  मी झोका खेळायला जाऊ का ? शाळा सुटल्यावर मी घरी कसा जाऊ ?  शाळा सुटल्यावर मला घरी सोडून द्या. मी आज चपला आणल्या नाही.  मला चहा प्यायचा आहे . अशा प्रश्नांची सरबत्ती वजा विचारपूस आपल्याकडे  होत असते. असे प्रश्न सर्वच विद्यार्थी विचारतात असेही  नाही. काही बालगोपाळ तर शाळेत इतके रमले की त्यांना घराची आठवण पण येत नाही. हे बालगोपाळ शाळेत रमण्यासाठी आम्ही शिक्षक बंधू बघीनिनी अनेक उपक्रम राबविले. जसे ह्या मुलांबरोबर खेळणे. खेळ घेणे .  एखादा शैक्षणिक विडिओ दाखविणे. एखादे बडबड गीत म्हणणे, विद्यार्थ्यांना  बडबड गीत म्हणायला लावणे.  कृतियुक्त गीत गायन घेणे. एखादी कृती करायला लावणे. एखाद्या गाण्यावर नृत्य करायला लावणे. तसेच  अनेक अॅप्स  मुलांना रमवून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात . जसे- painting and drawing for kid ,  drawing ,  ABC Kids - Tracing & phonics. इत्यादी .  परिसरातील प्राणी, पक्षी, झाडे, फळे, फुले, यांच्या विषयी  ह्या छोट्या दोस्तांकडे भरपूर माहिती  असते व ते आवडीने सांगतात. विविध प्राण्यांचे , पक्षांचे आवाज हे  बालगोपाळ  काढतात. त्यांचे हावभाव करून दाखवितात. काही बालगोपाळ तर पाटीवर सुंदर चित्र पण काढतात.   अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शाळेच्या वातावरणात आम्ही  रमवू शकलो.  आता हे  विद्यार्थी शाळेत रमायला लागले. स्वतः हून  शाळेच्या उपक्रमात सहभाग घेऊन आनंद घ्यायला लागलीत. नवीन लावलेले झाड त्या परिसराबरोबर  एकरूप होऊन नवी उर्जा घेऊन नवी  पालवी फुटावी. तशीच आमची बालगोपाळ मंडळी शालेय वातावरणात समरस होत आहे. असा हा शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थी , शिक्षक , शिक्षण व  शाळा यांना  समृध्द करणारा  प्रेरणादायी व प्रेरकच  आनंदाचा सोहळाच होता.  शाळा म्हणजे मुलांच्या भावविश्वात आमूलाग्र बदल घडविणारी प्रयोगशाळाच. आपण शिक्षक अनेक उपक्रम, प्रात्यशिक , प्रकल्प , कृती , कला , संगीत ,  क्रीडा यांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना समृध्द करण्यासाठी  प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो .   अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुकर करण्यासाठी आज राज्य भरतील अनेक शिक्षक बंधू बघिनी ब्लॉग, शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक संमेलन , अॅप्स, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य आदींच्या निर्मितीतून  प्रयत्न करत आहेत. अशा सर्व बंधू  बघिनींना माझा त्रिवार प्रणाम. प्रगत महाराष्ट्र करण्याचा घेतलेला  वसा पूर्ण करण्यासाठी  आपली वाटचाल अशीच  चालू ठेऊया. जय PSM  ............  

                               *** आमच्या शाळेतील प्रवेशोत्सव   ***












=





























माझा ब्लॉग आवडल्यास नक्की कॉमेंट करा.  9421509204








२ टिप्पण्या:

  1. आठवणींना उजाळा मिळाला.....
    सुंदर लेखन केलंय..
    खरंच चांगलं ते सर्व मांडलंय...

    बालगोपाळ त्यांची दुनिया आपल्या नजरेनं बघतात...
    त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट संस्कार आई-वडीलांच्या नंतर आपली मोठी जबाबदारी असते...
    पालक शिक्षकांवर पक्क्या विश्वासानंतरच भरोसा करतात...
    आपल्यावरील भरोसा ही आपल्या कामाची पावती आहे...
    Be positive...

    उत्तर द्याहटवा